Poems

एथॉस

चावून चाटणे अन् चाटून हे पाहाणे |
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ||

खिडकीस कावळ्यांचा कां सांग भार व्हावा ?
जातां कुठे फिराया बोकाहि कां दिसावा ?
शोधीत उंदरांना निस्तब्ध हे राहाणे |
मी ओळखून आहे……

मी दूरदेशी जातां माझ्यावरी रुसावे |
कवळून शर्ट माझा दारांत तूं बसावे ||
डोळ्यांत आंसवे अन् – सोडून देशी खाणे |
मी ओळखून आहे ……

पारा चढे उन्हाचा! हो आग, आग गात्री |
वातानुकूलनाचा घेतोस हट्ट रात्री ||
भय वाढत्या बिलाचे आम्हास, तूं न जाणे |
मी ओळखून आहे…..

भुंकून जीव खाशी, संताप हो मनाचा |
सोडून सर्व जावे, निर्धारही क्षणाचा ||
नजरेतला जिव्हाळा ! मन पाझरे दिवाणे |
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ||
अलका.

वियद्गंगा. ६.५.१९

तडे मातीस गेल्यावर

फुले, पाने कुठे जाती ? तडे मातीस गेल्यावर?५
तृणाची वाळली पाती तडे मातीस गेल्यावर ||

वठूनी वृृक्ष तो जाता डहाळ्या जाहल्या काड्या |
मळे, वाड्या जळुन जाती तडे मातीस गेल्यावर ||

प्रयत्नांनी नि कष्टांनी फुलवल्या साजऱ्या बागा |
पुऱ्या ओसाड त्या होती तडे मातीस गेल्यावर ||

घरे जाळून पक्षांची उजळली आपुली घरटी |
विझुन जातील त्या वाती तडे मातीस गेल्यावर ||

अरण्ये संपता सारी पशू फिरतात रस्त्यावर |
खुडूनी टाकली नाती तडे मातीस गेल्यावर ||

नसे पाऊस ना पाणी, विराणे आज नंदनवन |
उन्हाने रापली शेती, तडे मातीस गेल्यावर ||

प्रदूषण घालते थैमान, सरे झरल्याविना श्रावण |
फुलुन यावी कशी धरती, तडे मातीस गेल्यावर ||

प्रदूषण माजले भवती, सरे पाण्याविना श्रावण |
फुलुन यावी कशी धरती? तडे मातीस गेल्यवरअलकानाडकर्णी. ©️®️

भास

साद येते तुझी, भावतो भास हा |
मोहुनी चित्त बोलावतो भास हा ||

दूर आहेस तू, जाणते मी तरी
फूल होऊन गंधावतो भास हा ||

अंगणी वाजती का तुझी पाउले ?
संभ्रमी ह्याच नादावतो भास हा ||

चाल वाटे कुणाची तुझ्यासारखी ?
वंचितो आणि लोभावतो भास हा ||

सांज होता तुझी वाट मी पाहते|
गोडसे खूळ का लावितो भास हा||

झोप येता तुझी शेजही घालते|
एकटीलाच वेडावतो भास हा||

आठवाने तुझ्या लांबते यामिनी|
तूच होऊन जोजावतो भास हा ||

अलका नाडकर्णी.
©️®️

कोजागिरी. १३.१०.१९


चंद्र आला वयात आकाशी
चांदण्याची वरात आकाशी

चांदण्याचेच माळुनी गजरे
नाचते चांदरात आकाशी

लेऊनी साज चंद्रतेजाचा
मेघ साजे नभात आकाशी

पर्वतातून वाहती निर्झर
चांदण्याचा प्रपात आकाशी

सावळासा प्रकाश चंद्राचा
रंग भरतो वनात आकाशी

सोहळा भोगण्यास चंद्राचा
थांबली आज रात्र आकाशी

सानुले होडके तुझे माझे
डोलते सागरात आकाशी

उमलता फूल प्रीतिचे हृदयी
चंद्र हासे मनात, आकाशी.

अलका नाडकर्णी. ©️®️

स्पर्धेसाठी.

अधीऱ्या रातराणीला उन्हामध्ये बहर आला|
कसे सांगू कुणासाठी मनामध्ये बहर आला||

हिवाळ्याची कडक थंडी न ओसरली हवेमधुनी|
जरासे ऊन शिंपडले, वनामध्ये बहर आला||

कळी नाजूक होती लाजरी अलवार मिटलेली|
पसरला गंध, भ्रमराच्या मनामध्ये बहर आला|

जरा हिरवाच होता आमराईचा नवा मोहर|
कुहुकली कोकिळा, अन काननामध्ये बहर आला||

तमाने व्यापले होते हृदय काऴ्या पयोदांचे|
असा लखलखाट बिजलीचा, घनांमध्ये बहर आला||

गरजले मेघ आल्या अमृताच्या रेशमी धारा|
थिरकला मोर, केतकिच्या बनामध्ये बहर आला||

कुणा पाहून खुलते चित्त कोणाचे कसे सांगू?
हृदय हृदयास जुळता बंधनामध्ये बहर आला||


अलका नाडकर्णी. ©️®️

ऐश्वर्य. १२.८.१९

संकटी पडता अचानक धैर्य
येते माणसाला
पाहुनी मरणा समोरी शौर्य येते माणसाला

धावतो टाकीत धापा धन मिळवण्या जन्म सारा
फक्त वित्ताने कधी का स्थैर्य येते माणसाला

कठिण नसते दुखविणे कोणास भलते बोलुनी वच
संयमी बांधून मन माधुर्य येते माणसाला

पाखरू उडते मनाचे ह्या फुलावर त्या फुलावर
खोल चिंतन करून मग गांभीर्य येते माणसाला

चंचला लक्ष्मी कधी असते कधी नसते प्रसन्न
मित्र-विद्या-कीर्तिने ऐश्वर्य येते माणसाला

अलका नाडकर्णी. ©️®️

ऋतुराणी बरखा

रणरणत्या गगनात उमटला श्यामलसा ठिपका |
सरे उन्हाळा असह्य , आली
ऋतुराणी बरखा ||

नकोनकोसा वाटत होता
जो वारा जळता ,
जवळीक जलदांची त्यालाही
देईल शीतलता |
सुखद शिरशिरी उरी आणतील मंद मंद झुळुका,
सरे उन्हाळा असह्य,
आली ऋतुराणी बरखा ||

दाटतील घन होईल सारा
आसमंत कुंद,
दिशादिशांतून भरून राहील
मादक मृद्गंध |
तळी साचतील, जळी नाचतील स्वप्नांच्या नौका ,
सरे उन्हाळा…

हिरव्या अंगी उमलून येईल
गवताची ऱक्षा,
उमाडलेल्या गुलमोहराचा
उतरणार नक्षा |
जळात मिस़ळून प्रकाश होईल थोडा झांझुरका,
सरे उन्हाळा…..

मळकट झाडे झळकून उठतील करूनिया स्नान,
उगवतील बीजांकुर,
गातील नवजीवनगान |
फुले माळुनी नटतील, कोमल
वेलींच्या शाखा,
सरे उन्हाळा……

सुसाट वाहील वादळवारा,
घन ओतील पाणी,
मध्यरात्रीला जाग आणतील
धारांची गाणी |
चिंब नभावर वीज फडकवील
शुभ्र अग्निरेखा ,
सरे उन्हाळा….

पर्वतात वेलींच्या जाळीत
झुळझुळेल पाणी |
रूप त्यांत निरखुनी हरखुनी
हसेल वनराणी ,
दरीदरीतून प्रपात घुमवील
ऊर्जेचा ओंकार,
सरे उन्हाळा…..

श्रावणात दरवळेल पिवळे
रान केतकीचे,
सुवासिनी कनकलिली वाटील वाण सुगंधाचे |
चंपक परिमल घेऊन येईल वाऱ्याचा झोका,
सरे उन्हाळा……

काबिज करण्या जमीन येईल
पाण्याचा रेटा,
सीमा तोडून उड्या घालतील
अनिर्बंध लाटा |
एकवटून बळ समुद्र मारील
किनाऱ्यास धडका,
सरे उन्हाळा….

गरजतील घन, करील चपला
कडकडाट गगनी,
घुमू लागतील ढोल, नाचतील मोर, धुंद विपिनी
भिनेल नकळत पावलात त्या
नृत़्याचा ठेका,
सरे उन्हाळा….

नव्या उमेदीत उठेल यौवन
झटकुनी अंगांग,
खुलेल कोमल करकमलावर
मेंदीचा रंग |
अंतरंग गीतातून उकलील
उंच उंच झोका,
सरे उन्हाळा असह्य,
आली ऋतुराणी बरखा ||
 
असाच आला होता एथॉस
माझ्या अंगणात, घरात, मनांत.
क्षणभर किलबिल करून उडून जाणाऱ्या चिमणीसारखा…,
ध्यानीमनी नसताना…
अनाहूत.
वाऱ्याच्या सुखद, सुगंधी झुळुकेसारखा.

त्याच्या बाललीलांनी प्रौढत्वाला पोरपण दिलं,
हंसणं विसरलेलं घर
खेळकर झालं,
काहीश्या अलिप्त कुटुंबाला
हक्काने आपलंसं केलं.

दाराची घंटी वाजली की स्वागताला हा जाणार,
आपण चपला घातल्या की
लिफ्टकडे हा धावणार,
मनांत आले की आम्हाला बागेत फिरायला नेणार.

त्याचं शैशव, त्याचं तारुण्य,
त्याचं स्वाभिमानी म्हातारपण
आणि अगतिक आजारपण…
बारा वर्षांच्या इवल्याश्या कालावधीत
संपूर्ण आयुष्याचा प्रवास करवून गेला.

जाताना मायेची शिदोरी घेऊन गेला, आणि
आसवं विसरलेल्या डोळ्यांना
वाहतं करून गेला.

सुखदुःख. २५.११.१९

सौख्याला मी कवळू बघते दोन्ही हाती
गळामिठी पण दु:ख घालते दोन्ही हाती

तुकडे तुकडे रचुन रेखते चित्र सुखाचे
वाऱ्यावरती सहज उधळते दोन्ही हाती

सुख अंतरते, दु:ख पाडते मोह मनाला
प्रेमभराने जवळ ओढते दोन्ही हाती

दारी फुलला गुलाब, त्याला फुले सुगंधी
सल काट्यांची हसत सोसते दोन्ही हातीं

दिन मावळता मनात जपते स्वप्न उषेचे
रात्रीचा मग तिमिर पेलते दोन्ही हाती.

अलका नाडकर्णी.